मंचर ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या महाविकास आघाडीत झाला बिघाड!अंगणवाड्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम शिवसेना व राष्ट्रवादीकडून स्वतंत्रपणे साजरा!!

1063

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीने मंचर ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडी करत निवडणूक लढवली. राज्यातील ही एक लिटमस टेस्ट आहे. अशी चर्चा झाली. पंधरा वर्षानंतर एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले वळसे पाटील व आढळराव पाटील समर्थक एकाच व्यासपीठावर जमले. मात्र निकाल लागून दहा दिवस होत नाही तोच आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर येत आहे. याला निमित्त झाले मंचर येथील अंगणवाडी इमारतीच्या भूमीपूजनाचे.

मंचर गावठाणातील काझीपुरा येथील अंगणवाडीचे काम सुरु होण्याअगोदरच शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने प्रतिष्ठेची लढाई सुरु केली आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईमुळे ग्रामपंचायत निवडणुकीला गावच्या विकासासाठी एक आलो आहोत असे मंचरकरांना सांगणारे व हातात हात घालून महाविकास आघाडीचा प्रचार करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याची चर्चा मंचर मध्ये ऐकावयास मिळत आहे. मंचर गावठाण मधील वार्ड क्रमांक तीन मध्ये काजीपुरा या ठिकाणी बुधवार दिनांक २७ रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंगणवाडीचे भूमिपुजन उद्योजक देवेंद्रशेठ शहा यांच्या हस्ते संपन्न झाला ,यावेळी जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई थोरात ,पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला एकत्र आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने तयार केलेल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमपत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांच्या फोटोसह ठराविक पदाधिकाऱ्यांचा उल्लेख होता. परंतु यामध्ये कोणाच्याही पक्षाचा उल्लेख नसला तरी समस्त ग्रामस्थ मंचर असे म्हटले होते. सदर अंगणवाडीसाठी जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत मोरडेवाडी ,मुळेवाडी ,भेकेमळा ,व मंचर गावठाण हद्दीत पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई थोरात यांच्या यांच्या प्रयत्नाने सहा अंगणवाड्या मंजूर झाल्या आहेत. प्रत्येक अंगणवाडीसाठी ८.५० लक्ष निधी मंजूर झाला आहे. आणि त्या मंजूर अंगणवाडी पैकी मंचर गावठाण मधील काजीपुरा या ठिकाणी उद्योजक देवेंद्रशेठ शहा यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. असे राष्ट्रवादीच्या कार्यक्रर्त्यानी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टवर खुलेआम दिसत आहे. यानंतर काही वेळातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी भूमिपूजन केले . शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनि सोशल मीडियावर दिलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर येथील काझीपुरा अंगणवाडीसाठी रक्कम रु ८ लक्ष ५० हजार सन २०१९-२०२० मंजूर झालेले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे सदर अंगणवाडीचे बांधकाम सुरु करता आलेले नव्हते. तर त्याच दिवशी थोड्या तासाच्या फरकाने मंचर येथील काझीपुरा अंगणवाडीचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी शिवसेना ,भाजप , काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपथित होते. एकाच ठिकाणी झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यकर्ते नेमके वैयक्तिक पक्षाचे म्हणायचे कि महाविकास आघाडीचे कि मंचरचे ग्रामस्थ हा मोठा चमत्कारिक प्रश्न प्रतिष्ठेच्या लढाईमुळे उपस्थित राहिलेल्याना नक्कीच पडलेला असणार…पण या प्रतिष्ठेच्या लढाईमुळे मंचर शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील दुहेरी विचारसरणी मंचरकरांच्या समोर नक्कीच आली आहे.
शुक्रवारी सरपंचपदाचे आरक्षण निघाल्यानंतर मंचरच्या सरपंच उपसरपंचाची निवड होईल. त्यावेळी महाविकासआघाडी टिकली की फुटली याचे चित्र स्पष्ट होईल. सरपंचपद शिवसेनेला, तर उपसरपंचपद राष्ट्रवादी, कै. किसनराव बाणखेले गटाला मिळेल अशी शक्यता आहे. शिवसेनेचे संख्याबळ पाहता त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.