मंचर ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच निवड बिनविरोध…..

1547

मंचर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या किरण देविदास राजगुरू यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसरपंचपदी माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचा वारसा असलेले त्यांचे नातू युवराज प्रल्हाद बाणखेले यांची बिनविरोध निवड झाली आहे,स्व. किसनराव बाणखेले यांची स्वप्ने पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांची सून व नातू यांनी ग्रामपंचायत निडणूक लढवून समाजसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
मंचर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस लोकनेते माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचा गट यांनी मिळून निवडणूक लढविली. तीनही पक्षाच्या महाविकास आघाडीने 17 पैकी 16 जागा जिंकल्या होत्या. एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला. ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला या जागेसाठी आरक्षित आले होते. प्रभाग क्रमांक चार मधून किरण देविदास राजगुरू या एकमेव महिला अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून विजयी झाल्याने त्यांची सरपंचपदी निवड निश्चित होती. उपसरपंचपद राष्ट्रवादी किंवा बाणखेले गटाला मिळणार होते. ग्रामपंचायत सभागृहात सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक कालेकर व सहाय्यक के.डी. भोजने यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सरपंचपदासाठी किरण देविदास राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना सदस्य सतीश अरुण बाणखेले हे सुचक होते. उपसरपंच पदासाठी उत्सुकता होती. मात्र या जागेसाठी युवराज प्रल्हाद बाणखेले यांचा एकमेव अर्ज आला. त्यांना ग्रामपंचायत सदस्य ज्योती निघोट या सूचक झाल्या. सरपंच, उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडले गेल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कालेकर यांनी केली. नवनिर्वाचित सरपंच किरण राजगुरू व उपसरपंच युवराज बाणखेले यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, अविनाश रहाणे, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया, मंगेश बाणखेले, प्रवीण मोरडे, संजय बाणखेले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरडे, दिपाली थोरात, सुप्रिया राजगुरव, वंदना बाणखेले, सविता शिरसागर, श्याम थोरात, रंजना आतार, पल्लवी थोरात, ज्योती थोरात, ज्योती बाणखेले, कैलास गांजाळे, अरुण बाणखेले, माणिक गावडे आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, नवनाथ नाईकडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
मंचर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कन्या सरपंचपदी विराजमान झाली आहे. मागील 35 वर्षांपासून मंचर ग्रामपंचायतमध्ये काम करणारे देविदास राजगुरू यांची किरण राजगुरू ही कन्या आहे. सध्या कार्यालयीन प्रमुख या पदावर काम करणारे देविदास राजगुरू यांचे अभिनंदन अनेक जण करत होते. शिवसेना ग्राहक मंचाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू यांची सरपंच किरण राजगुरू हि पुतणी आहे.लोकनेते माजी खासदार स्व.किसनराव बाणखेले यांचे नातू युवराज बाणखेले हे उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले असून अण्णांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास किसनराव बाणखेले यांचे सरपंच किंवा उपसरपंच पदाचे स्वप्न होते, युवराज बाणखेले यांना उपसरपंच पद मिळाल्याने कैलास बाणखेले यांचे स्वप्न पूर्ण केले तर वंदना कैलास बाणखेले ह्या सुद्धा कैलास बाणखेले यांचे स्वप्न पूर्ण करण्यास सदस्य म्हणून सज्ज झाल्या आहेत.