घोडेगाव पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात एका जेष्ठ नागरिकाचा व युवकाचा मृत्यु ..

1478

सिताराम काळे

– घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रामध्ये दोन वेगवेगळया झालेल्या घटनांमध्ये नारोडी येथे एका जेष्ठ नागरीकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला तर घोडेगाव येथे एका युवकाला विद्युत करंट बसुन मृत्यु झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

नारोडी येथील गणपत भाऊ हुले (वय- ८०) यांचा त्यांचा मुलगा बाबुराव हुले शोध घेत असताना नदीचे कडेला घोड नदीपात्रात पाण्यात तरंगताना मिळून आले. त्यावेळी त्यांना ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे आणले असता डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्यात बाबुराव गणपत हुले यांनी दिली.

दुस-या घटनेत घोडेगाव येथील अमोल गौतम वाघमारे (वय – २८) हा घोडेगाव नारूड पांधी (शेवगा) येथे त्याचे घराचे पाठीमागील बाजुस शेतात पाणी देण्याचे मोटारीजवळ अजय वाघमारे व तुषार दौंड यांना पडलेल्या अवस्थेत दिसला अन् त्याचे डावे हातात मोटारीला जोडलेली विद्युत वायर दिसली. त्यावेळी या दोघांनी घरामध्ये जाऊन संबंधित वायर मधील विद्युत पुरवठा बंद केला. ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मयत झाले असल्याचे सांगितले. याबाबतची खबर घोडेगाव पोलीस ठाण्यात तुषार संभाजी दौंड यांनी दिली. या दोन्ही घटनांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश झनकर व अनिल बकरे करत आहे.