भीमाशंकर डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी व सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार – दिलीप वळसेपाटील…..

790

भीमाशंकर डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी व सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण करणार – दिलीपवळसे पाटील

साखर उद्योगातील आजच्या स्पर्धेच्या काळात ऊस उत्पादकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी व कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणी व सहवीजनिर्मिती प्रकल्प विस्तारीकरण करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक संचालक व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी दत्तात्रयनगर, पारगाव, ता.आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या व दत्तात्रय ऊस तोडणी वाहतूक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कारखान्याची सन २०२०-२१ ची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाचे सर्व नियम पाळून ऑनलाईन पध्दतीने मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, पूर्वाताई वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, दगडू मारुती शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात, आण्णासाहेब पडवळ, भगवान बो-हाडे, तानाजी जंबूकर, अक्षय काळे, ज्ञानेश्वर अस्वारे, रमेश कानडे, रमेश लबडे, किसन उंडे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, जनाबाई आजाब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर जाहीर केला. परंतु मध्यंतरीच्या काळात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी असल्याने साखरेची विक्री झाली नाही. त्यामुळे गोडाऊनमध्ये साखर पडून राहिल्याने बँकेच्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढतच गेला. परिणामी ब-याच साखर कारखान्यांना तोट्यात साखर विक्री करावी लागली. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेस चांगला भाव मिळत असल्याने विक्री होत आहे. पुढील हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा पुरवठा करणा-या ब्राझील देशात दुष्काळची परिस्थिती असल्याने तसेच केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यास परवानगी दिल्याने इथेनॉल निर्मितीत वाढ होवून साखरेचे उत्पादन कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय बरोबरच देशांतर्गत बाजारात साखरेचे दर चांगले राहतील. शेतक-यांचे एकरी उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु. यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष १३० मे.टन योजने अंतर्गत विविध सोयी सवलती दिल्यामुळे फलस्वरूप शेतक-यांच्या एकरी उत्पादनात वाढ होवून कार्यक्षेत्र व परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे.
कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे प्रास्ताविकात म्हणाले की, गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये ६००० टीसीडी विस्तारीकरणाचे काम कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आव्हानात्मक असताना देखील यशस्वीरित्या पूर्ण करून उच्चांकी ९ लाख ६९ हजार ९२० मे.टन गाळप करून १० लाख ९१ हजार ५३८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ११.२४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पामार्फत ७ कोटी १३ लाख ६९ हजार युनिटचे उत्पादन होवून कारखाना वापर वजा जाता ४ कोटी १६ लाख ४ हजार युनिट वीज वितरण कंपनीस निर्यात केले आहे. कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.