नागरिकांना घर बसल्या मिळणार जमिनी संबंधित जुने अभिलेख…..

239

राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील भूमि अभिलेखांचे संगणकीकरण करून ते जनतेला ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. जमिनीविषयक जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याकरिता ई-अभिलेख हा महत्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
मुंबई शहर वगळता 35 जिल्ह्यांतील सर्व तहसील, भूमि अभिलेख व नगर भूमापन कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग कामकाज अंतिम टप्प्यात असून सद्यस्थितीत 22 जिल्हयांचे स्कॅनिंग कामकाज पूर्ण होऊन ऑनलाइन अपलोड करण्यात आले आहेत. या 22 जिल्ह्यांतील विविध प्रकारचे अभिलेख जसे की जुने 7/12, जुनी फेरफार नोंदवही, चालू खाते उतारा, टिपण, आकारबंद, योजना पत्रक, क.जा.प, आकारफोड, जुन्या मिळकत पत्रिका, चौकशी नोंदवही, असाक्षांकित केवळ
पाहण्यासाठी इ.अभिलेख
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या संकेतस्थळावर जनतेस विनामूल्य
उपलब्ध आहेत. नागरिकांना विविध कारणांसाठी आपल्या मालमत्तेसंबंधित जुन्या अभिलेखांच्या
साक्षांकित प्रतींची आवश्यकता असते असे अभिलेख नागरिकांना घर बसल्या उपलब्ध व्हावेत याकरिता अपलोडिंग पूर्ण झालेल्या 22 जिल्ह्यांचे स्कॅन झालेले अभिलेख डिजिटली साक्षांकित करणेचे कामकाज महसूल व भूमि अभिलेख विभागाकडून सुरू आहे.
दि. 19/01/2024 पासून 22 जिल्हयांचे जे अभिलेख डिजिटली साक्षांकित झालेले आहेत ते अभिलेख https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचे शुल्क नागरिकांना ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारे भरता येईल. उर्वरीत अभिलेख जसजसे साक्षांकित होतील तसतसे जनतेस उपलब्ध करून देण्यात येतील. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख विभाग, महाराष्ट्र
राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.