शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न बाबत आमरण उपोषणाला बसलेले मंचर शहराचे माजी सरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ताभाऊ गांजाळे यांच्या उपोषणाची प्रशासनाने चार दिवसात दखल न घेतल्यामुळे पाचव्या दिवशी त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातच उपोषण सुरू केल्यामुळे प्रशासनाने तात्काळ धाव घेत त्यांची बाजू समजून घेऊन याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले व नारळ पाणी देऊन तुर्त उपोषण थांबविण्यात आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बिबट्याच्या भीतीमुळे रात्रीचे शेतीला पाणी देता येत नाही त्यासाठी दिवसा वीज मिळावी त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावात वाढलेले बिबट्याचे हल्ले, त्यांची वाढती संख्या, दोन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कांद्याला निर्यात बंदी केलेली उठवावी व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे काढलेल्या विमाचे पैसे मिळावे त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेले अनुदान द्यावे व जलसंपदा विभागाकडून अचानक वाढवलेली पाणीपट्टी कमी करावी आधी मागण्यासाठी दत्ता गांजाळे यांनी मंचर येथील छत्रपती शिवाजी चौकात दि. १८ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते, मागील चार दिवसापासून प्रशासनाने या उपोषणाकडे व त्यांच्या मागण्याकडे पाठ फिरवली शेवटी दत्ता गांजाळे यांनी चांडोली बुद्रुक येथील बेलदत्त वाडी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजरामध्येच आमरण उपोषण करण्याचा शेवटी निर्णय घेतला, यावेळी त्यांच्यासमोर जिल्हाप्रमुख सुरेश भोर, अरुण नाना बाणखेले, रंगनाथ जाधव, विकास जाधव, संजय शिंदे, दत्तात्रेय खानदेशे राजू बाणखेले उपस्थित होते.
आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल शशिकांत मडके, ऋषी कोकणे पाटबंधारे खात्याचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वतीने बिबट्यांच्या नसबंदीसाठी पाठवलेला प्रस्तावाची प्रत गांजाळे यांना देऊन इतर मागण्या संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन देऊन तहसीलदार संजय नागटिळक व स्मिता राजहंस यांनी नारळ पाणी देऊन उपोषण संपविले आहे.
याबाबत गांजाळे म्हणाले प्रशासन नेहमीच आपली भूमिका बजावत असते मात्र तालुक्यात असणाऱ्या या गंभीर शेतकऱ्यांच्या समस्या बाबत आमदार खासदार या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्या कडे लक्ष देणे गरजेचे असून याबाबत त्यांनी निर्णय घेतला नाही तर पुढील काळात प्रत्येक गावात शेतकरी बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने दिला आहे.
Home आपलं आंबेगाव शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दत्ता गांजाळे यांची बिबट्या पकडण्याच्या पिंजऱ्यातून डरकाळी…नंतर आली प्रशासनाला जाग.