अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालय इमारती साठी ३४ लाख मंजूर, सततच्या पाठपुराव्याला यश.

263
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे सुसज्ज असे तलाठी कार्यालय व्हावे अशी ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षापासून मागणी केली होती, प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे या मागणीकडे दुर्लक्ष होत होते, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे 34 लाख रुपये मंजूर करून ग्रामस्थांची अनेक वर्षांची ही मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
अवसरी बुद्रुक गावाला मोठा इतिहास आहे सन 1800 च्या काळात या गावाला तालुक्याचा दर्जा होता असे अनेक जुन्या कागदपत्रावरून निदर्शनात येत आहे, या ठिकाणी ब्रिटिशकालीन चावडी होती त्या जागेवर तलाठी कार्यालय व्हावे अशी मागणी ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून करत होते, प्रशासन मात्र या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे ती मागणी मान्य होत नव्हती. 2009 साली आंबेगाव तालुक्यासाठी 11 तलाठी कार्यालय मंजूर झाली होती मात्र त्या गावांमध्ये महसूल विभागाला जागा नसल्यामुळे मंजूर पैकी अनेक कार्यालय रद्द झाली. मात्र अवसरी बुद्रुक या गावांमध्ये बाजारपेठेत मोक्याच्या जागेवर महसूल विभागाची चावडीची जागा आहे त्या ठिकाणी तलाठी कार्यालय व्हावे ही मागणी ग्रामस्थ करत होते, हे कार्यालय होण्यासाठी वृत्तपत्र माध्यमातून अनेक वेळा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.
 काही वर्षांपासून तलाठी कार्यालय हे ग्रामपंचायतच्या छोट्या जागेत कार्यरत असून या तलाठी कार्यालयात अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, गावडेवाडी या तीन गावांचे महसूल विभागाचा काम चालू असते, मागील वर्षी मार्च महिन्यात हे कार्यालय बांधण्यासाठी मंचर येथील उपविभागीय कार्यालयासमोर पत्रकार जयेश शहा व ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तत्कालीन उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर व तहसीलदार रमा जोशी, मंडल अधिकारी विश्वास शिंदे, तलाठी संकेत गवारे यांनी कागदपत्राची पूर्तता करून प्रशासनास प्रस्ताव पाठविले. त्यानंतर मध्ये जिल्हा नियोजन मंडळाची बैठक न झाल्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष झाले. ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली, त्यांनी तात्काळ दखल घेत ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण करून सुमारे 34 लाख रुपये मंजूर केले आहे याबद्दल ग्रामस्थांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे अभिनंदन केले आहे.