शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असून गहाळ न बसता कार्यकर्त्यांनी कामाला लागा – अजित पवार…

159
Google search engine

लोकसभेची निवडणूक देशाचे धोरण ठरवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या भागातून आपल्या विचाराचा खासदार निवडून येणे गरजेचे आहे. शिरूर लोकसभेसाठी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असून गहाळ न बसता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आमदार पोपटराव गावडे, सुरेश घुले, प्रदीप गारटकर, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, किरण वळसे पाटील, कल्पना आढळराव पाटील, शंकर पिंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, युवक अध्यक्ष अंकित जाधव आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची शान जगात वाढवली आहे. तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी या भागातून आपल्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा करून अजित पवार म्हणाले कार्यकर्त्यांनी आता गहाळ राहता कामा नये आपल्याला सदैव उपलब्ध राहणारा खासदार हवा आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे. आढळराव पाटील यांची घर वापसी झाली आहे असे सांगून तुम्ही भावनिक होऊ नका समोरचा उमेदवार लवकर कामाला लागला आहे. तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. चित्रपट मालिका काम करणे ठीक आहे मात्र जनतेसमोर घाम गाळावा लागतो. अशी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर खरमरीत टीका करून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मागील वीस वर्ष मतदारसंघासाठी भरीव काम केल्याचे गौरवदगार त्यांनी काढले. सत्तेत सहभागी होऊन आम्ही चूक केली नाही. विकासाच्या मागे उभे राहिलो मात्र विचारधारा सोडली नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवला जाईल. तालुक्यातील उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांना एक लाखाचे मताधिक्य दिले पाहिजे असेही ते म्हणाले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले शिवाजीराव व आम्ही समाजासाठी काम करतोय. राजकीय विचारधारा वेगळी असताना आम्ही एकमेका विरोधात कधीही चुकीचा शब्द बोललो नाही. आढळराव पाटील कार्यकर्त्यांसह पक्षात आले असून त्यांचे स्वागत करतो. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना मानपान तसेच त्यांना असणारे स्थान तसेच ठेवून आपण एक दिलाने काम करूया. राजकीय जीवनात वैयक्तिक काही मिळवायचे नाही. जे असेल ते समाजासाठी करायचे आहे. समाजासाठी चांगले स्थान निर्माण करायचे आहे असे सांगून शिवाजीराव तुम्ही शिवसेनेत असताना मी तुम्हाला विधानसभेला उमेदवार सुद्धा दिले अशी निष्कील टिप्पणी वळसे पाटील यांनी केली वीस वर्षानंतर पुन्हा स्वगृही परततोय असे सांगून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले मी हाडाचा राजकारणी नाही. मात्र जनतेच्या आशीर्वादाने तीन वेळा चढत्या मताधिक्याने लोकसभा निवडणूका जिंकलो. चौथ्यांदा पराभव होऊनहीं खचून गेलो नाही. पाच वर्ष मतदारसंघात फिरून जनतेशी संपर्क ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मागील दीड वर्षात तब्बल दीड हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहे. येणारी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भूलथापांना बळी पडू नका पाच वर्ष मतदारसंघाचे झालेले नुकसान तुम्ही पाहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भक्कम पाठिंबा देत त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या आवडीचा खासदार निवडून द्या असे आवाहन आढळराव पाटील यांनी केले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आजचा क्षण आहे. अजित पवार हा इतिहास बदलणारा नेता आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघात पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आढळराव पाटील यांना लाखोंच्या फरकाने विजयी करा. शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेला निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा दावा आमदार अतुल बनके यांनी केला. आमदार दिलीप मोहिते म्हणाले माझे भांडण वैयक्तिक नाही तर माझ्या तालुक्यासाठी होते. आढळराव पाटील यांच्याबरोबर वीस वर्षे संघर्ष केला. आमच्या दोघांमध्ये राजकीय मतभेद होते ते मिटवण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. मतभेद विसरलो नाही तर पक्ष पुढे जाणार नाही एकोप्याने काम केले पाहिजे त्यामुळे आजपासून सुपंथ धरावा असे मोहिते म्हणाले. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निलेश थोरात यांनी स्वागत केले. मथाजी पोखरकर, अशोक बाजारे यांनी सुरुवातीला मनोगत व्यक्त केले. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समवेत शिवसेनेच्या बहुतेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यामध्ये उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, प्रकाश वाडेकर, लक्ष्मण काचोळे ,तालुकाप्रमुख संतोष डोके, रवींद्र करंजखेले, शिवाजी राजगुरू, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, स्वप्निल बेंडे पाटील, शिवाजी राजगुरू, शशिकांत बाणखेले, शितल तोडकर, सरपंच संगीता शेवाळे, उपसरपंच अंकुश लांडे ,रामदास जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आमदार दिलीप मोहिते यांचा विरोध असल्याची चर्चा सुरू होती. मेळावा सुरू झाल्यानंतरही मोहिते आले नव्हते त्यामुळे कुजबूज सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाषण सुरू असताना मोहिते यांचे सभास्थानी आगमन झाले. त्यावर टिप्पणी करत तटकरे यांनी मोहिते पाटील ऐन मोक्याच्या वेळी आले असून तुमचे टायमिंग गावस्कर सारखे आहे. अनेकांना शंका होती आढराव पाटील यांचा पक्षप्रवेश मोहिते यांना मान्य नाही. मात्र मोहिते पाटील सोबत आहे अशी टिप्पणी केली. याला उत्तर देताना मोहिते पाटील म्हणाले पुणे येथे कार्यक्रम होता शिवाय येताना वाहतूक कोंडीत सापडलो. त्यादरम्यान अनेकांचे फोन आले तुम्ही नक्की येणार का मात्र एकदा अजित दादा यांना शब्द दिला की शब्दाप्रमाणे वागणारा मी कार्यकर्ता आहे. अजित पवार यांच्या मागे मी उभा राहणार आहे. आंबेगाव तालुक्याबरोबर थोडे मतभेद होते. मी माझ्या तालुक्यासाठी भांडत होतो. आढळराव पाटील यांना विनंती आहे ज्याप्रमाणे आम्ही दादा मागे उभे राहिलो तसेच तुम्ही ठामपणे उभे रहा. आढळराव गट, वळसे गट ,मोहिते गट असे करू नका. उशीर झाल्याबद्दल गैरसमज नको असे स्पष्टीकरण मोहिते यांनी दिले.

 

Google search engine