गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैलांचा मृत्यू ,शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ – विवेक वळसे पाटील.

 जाहिरात

घोडेगाव – आंबेगाव तालुक्यातील साल (बाभूळवाडी) येथे अज्ञात व्यक्तीने बांधाचे गवत पेटविल्याने त्यांची आग गोठ्याला लागली व त्यात दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.साल बाभुळवाडी येथे झालेल्या घटनेबद्दल नुकसानग्रस्त शेतकरी गुलाब कदम, संतोष कदम यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

शेतकरी गुलाब कदम यांच्या शेतात बैलांचा गोठा आहे. त्या नजीकच अज्ञात व्यक्तीने शेताच्या बांधाचे गवत पेटविले. त्यावेळी वारा जास्त असल्यामुळे इतर शेतातील बांध पेटू लागले व दुपारी घरी कोणीच नसल्यामुळे या गोठ्यात आग शिरली या आगीत कदम यांच्या गोठ्यातील दोन बैल, शेती अवजारे, धान्य, पाईप हे आगीत जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

आंबेगाव जुन्नर उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार संजय नागटिळक यांचेशी संपर्क साधून झालेल्या घटनेचे त्वरीत पंचनामे करून शासकीय मदत लवकरात लवकर देण्यात यावी, ही विनंती केली. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर, स्थानिक शेतकरी अनिल गव्हाणे, बबन श्रीपती गव्हाणे, रोहित पोखरकर, गुलाब कदम, संतोष कदम, दिपक गव्हाणे आदि उपस्थित होते.

 

 जाहिरात