अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष व विद्यमान लोक नियुक्त सरपंच सारीकाताई हिंगे पाटील यांचे पती विलास (तात्या) उर्फ रत्नाकर गोविंद हिंगे पाटील (वय ५१) यांचे आज शुक्रवार दि. १९ रोजी सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी विद्यमान सरपंच सारिका हिंगे, दोन मुले हर्षवर्धन, ऋषिकेश, दोन विवाहित बहिनी असा परिवार आहे. विलास तात्या हिंगे हे मागील वीस वर्षापासून अवसरी बुद्रुक मधील प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर होते, त्यांनी शालेय व महाविद्यालय जीवनात देखील अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात हीरहिरेने भाग घेऊन आपला ठसा उमटविला होता, महाविद्यालयीन जीवनात कलेचा ठसा उमटत असतानाच त्यांनी आपल्या आवाजातून अनेक जुनी सदाबहार गीते गायली होती, महाविद्यालयीन जीवनात स्वर झंकार नावाचा ऑर्केस्ट्रा काढण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. याच बरोबरीने त्यांनी क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तीनही तालुक्यात केला होता. ते डावखुरे फलंदाज व गोलंदाज होते. महाविद्यालयीन जीवनातून पुढे जात असताना त्यांनी स्वतःला सामाजिक जीवनात वाहून घेतले होते. तंटामुक्ती अध्यक्ष असताना अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या वादाच्या घटना त्यांनी मध्यस्थी करून मिटविल्या होत्या आजही अनेक नागरिक त्यांचे नाव काढत होते. नुकत्याच तीन महिन्यापूर्वी झालेल्या अवसरी बुद्रुक ग्रामपंचायत च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सारिका ताई हिंगे पाटील यांना सरपंच मान मिळाला आहे. सारिका ताई सरपंच म्हणून काम करताना विलास तात्या हिंगे पाटील हे देखील गावातील प्रत्येक सामाजिक, राजकीय, धार्मिक कामात स्वतः वेळ देऊन काम करत होते.
त्यांचा अंत्यविधी अवसरी बुद्रुक येथील स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता झाला. सर्व संस्थांचे पदाधिकारी व जनसमुदाय मोठया संख्येने उपस्थित होता.