अवसरी बुद्रुक येथील भोकर शेतवस्तीवर तीन बिबट्यांची दहशत निर्माण झाली असून या बिबट्यांमुळे या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत सायंकाळच्या सुमारास व पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडता येत नसल्याने या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी उपसरपंच अनिल हिंगे यांनी केली आहे.
सध्या शेतामधील ऊस तोडणी झाल्याने बिबट्याने रहिवास मानलेल्या उसाचे क्षेत्र कमी झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सर्वत्र बिबटे सैरभैर फिरताना दिसत आहेत. अवसरी बुद्रुक येथील भोकर शेत या वस्तीवर सतीश हिंगे यांच्या घरानजिक मागील एक दीड महिन्यांपासून तीन बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे, पंधरा दिवसापूर्वी वन विभागाने या परिसरात पिंजरा लावला होता परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही मात्र हे तिन्हीही बिबटे नर मादी व बछडा हे या परिसरात नागरिकांना सायंकाळी व पहाटेच्या सुमारास एकत्र फिरताना दिसत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस लाईट असल्यावर शेतीला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचं बरोबर सायंकाळी च्या सुमारास घराबाहेर फिरताना देखील जीव मुठीत घेऊन फिरावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वस्तीवर भोकर शेत व येलभर मळा या परिसरात मोठी लोकवस्ती असून या तीन बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बऱ्याच वेळा उसाच्या क्षेत्रामध्ये दिवसादेखील बिबटे दिसत असल्याने तो कधीही येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वनविभागाने या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी, पंधरा ते वीस दिवसापूर्वी वनविभाग नागरी वस्तीमध्ये बिबटे येऊ नये म्हणून याच वस्तीवर एनिडिर ही आवाजाची यंत्रणा या परिसरात बसवणार होते मात्र तीही वन विभागाने बसवली नाही. वनविभागाने नागरिकांचा जीवाशी खेळू नये तात्काळ या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी सतीश हिंगे, श्रीहरी हिंगे, बापू येलभर, दीपक चौरे व अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.