मंचर शहरातील राम मंदिर ते चावडी चौकापर्यंत चालू असलेले सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम चालू होऊन दीड ते दोन महिने लोटून देखील काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना रहदारी करण्यासाठी तसेच बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मालाची देवाण घेवाण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने रस्त्याचे काम तातडीने करून रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी सुरळीत करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत बाणखेले व व्यापाऱ्यांनी केली आहे.
मंचर नगरपंचायतीवर प्रशासन असल्यामुळे स्थानिक नगराध्यक्ष, नगरसेवक कोणी नगरपंचायतीवर लक्ष द्यायला नाही त्यामुळे नगरपंचायतीच्या मनमानी कारभार चालला आहे. मंचर शहरातील हे काम काम मागील दीड दोन महिन्यापासून सुरू झाले आहे, रस्त्याच्या कामासाठी कोणतेही मोजमाप न करता मोठ्याप्रमाणात पूर्वीचा रस्ता उकरून मोठा खड्डा केल्याचे दिसत आहे, दोन्ही बाजूला बंदिस्त गटार रस्त्याच्या वर आलेले दिसत आहेत, त्यावरून अवजड वाहन गेल्यास गटारे उखडू शकतात तसेच मंचर शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य पाईपलाईन रोडच्या मधोमध गेलेली असल्यामुळे पाईपलाईन ची वारंवार तुटफुट होत आहे. हा रस्ता सिमेंटचा असल्यामुळे भविष्यात या पाईपलाईन मध्ये काही बिघाड झाल्यास तिची दुरुस्ती कशी करणार याचा कोणताही विचार नगरपंचायत च्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केलेला दिसत नाही. या कामा दरम्यान नागरिकांचे नळ कनेक्शन यांची देखील तोडफोड झालेली आहे ही कनेक्शन पूर्वत जोडून देण्यासाठी नगरपंचायत ने नेमलेल्या मजुरांनी येथील स्थानिकांकडून एक ते दोन हजार घेतल्याची तक्रार नागरिक करत आहेत. हा रस्ता करत असताना आजूबाजूच्या गल्ली बोळातून येणाऱ्या रस्त्याची ची लेव्हल योग्य प्रकारे काढलेली नाही यामुळे या भागातील नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना दोन महिन्यांपासून मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्याठिकाणी काम चालू आहे तो भाग मंचर ची जुनी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी होलसेल किराणा मालाची तसेच सोन्या-चांदीची मोठी दुकाने असून या संथ गतीने चालू असलेल्या रोड च्या कामामुळे येथील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अपूर्ण अवस्थेतील रस्त्यामुळे ऐन लग्न सराईत येथील सोन्या चांदीच्या दुकांनाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्या मुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून तसेच नागरिकांमध्ये रोष असून संथ गतीने चाललेल्या कामाबाबत नगरपंचायतच्या कामाबाबत संताप व्यक्त होत आहे. मंचर नगरपंचायतीच्या चाललेला मनमानी कारभार अजून किती दिवस चालणार असा सवाल नागरिक करत आहेत.