डिंभे धरणातील नामशेष झालेल्या आंबेगावच्या ऐतिहासिक पाऊलखुणा दर्शविणारे जैन मंदिर…

1033
Google search engine

सिताराम काळे.

आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसह नगर जिल्हयातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना वरदान ठरलेले आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण पाणी पातळी ८ टक्के झाल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील आंबेगाव हे गाव पुन्हा दृष्टीक्षेपात पडू लागले आहे. त्यामुळे या गावातील रहिवासी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत या गावाला भेटी देत आहेत.

डिंभे धरणात होण्याअगोदर अनेक वाडयावस्त्यांसह आंबेगाव हे तालुक्याचे ठिकाण होते. डिंभे धरणाच्या बांधणीनंतर या गावातील लोकांना आपल घरदार, शेती सार सोडाव लागल. आजही बुडीत आंबेगावचे गावठाण मधील धरणाचे पाणी कमी होते. त्यावेळी तेव्हाच्या गावातील गावक-यांना आपले हसत-खेळत, नांदत गावाचा आज दिसणारा ढिगारा पाहूून काळजाच पाणी पाणी होत. आजही वृध्द माणसांच्या डोळयापुुढे या आठवणी जशाच्या तशा जागृत आहेत. या धरणाच्या उभारणीनंतर अनेक गावे वाडयावस्त्या विस्थापित झाल्या. इतकी वर्षे गावात राहिलेल्या या लोकांना गाव सोडावे लागले. आंबेगावचे गावठाण हे १५० घरांचे होते. तर गावाला कोकणेवाडी व कानसकरवाडी या दोन वाडया होत्या. आंबेगावला असणा-या जिल्हा परीषद शाळेसह सातवीपर्यंत शिक्षण दिले जात होते. शाळेच्या मालकीची ४ ते ५ एकर जमिन होती. या शाळेत शेतीमूल शाळा म्हणत. मुले या शेतात श्रमदान करत असत. या ठिकाणी वसतिगृहाची सोयही होती. गावात असणारे शिवशंकर विदयालयात इयत्ता ५ ते १० पर्यंत शिक्षण होते, ते आता तळेघरला हलविण्यात आले आहे. आरोग्य केंद्र व पोलीस औट पोस्टही या ठिकाणी होते. आंबेगावात दळणवळणासाठी सकाळी ९ वाजता मुंबई एसटी गाडी व दुपारी १.३० वाजता टपाल एसटी गाडी गावात येत होती. चांगला रस्ता नसल्याने फारच थोडे लोक त्यावेळी श्री क्षेत्र भीमाशंकरला जात होते. आंबेगावची बाजारपेठ ही त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दिड किलोमिटर अंतरापर्यंत भरत असे. शिमग्याच्या (होळी) बाजार हा दोन ते तीन दिवस चालत होता. मोठया प्रमाणात येथे व्यापारी व आदिवासी घरे होती. त्यावेळी आदिवासींची देवाणघेवाण पैशाऐवजी वस्तुरूपातच होत होती.

आंबेगाव बरोबरच इतरही अनेक गावे, वाडया वस्त्या या डिंभे धरणामुळे विस्थापित झाल्या. वचपे येथे असलेले व घोडनदीच्या संगमावरील सिध्देश्वर मंदिरही या धरण जलपात्रात बुडीत झाले. डिंभे धरणाच्या बांधणीनंतर या गावातील लोकांना आपल घरदार, शेती सार सोडाव लागल. आंबेगाव गावठाणात महादेव, मारूती व मुक्ताबाई मंदिराबरोबरच जैन समाजाचे सुंदर मंदिरही आज इतकी वर्ष पाण्याचा मारा सोसत हे जैन मंदिर उभे आहे. विस्थापित होताना येथील जैन मंदिरातील मूर्ती तळेगाव स्टेशन (ता.मावळ) येथे हलविण्यात आल्या. घोडनदीला असणा-या गावाजवळच्या असणा-या डोहाला बाराही महिने असणारे पाणी गावाला पुरत असे. त्याचबरोबर विहीरी व आड गावात होत्या. आज पाण्याचा मारा सोसत उभे असलेले जैन मंदिर व मंदिराभोवती पूर्ण गावठाणात पडलेले विटांचे ढीग, तेलाची घाण्यांचे अवषेश आणि देवतांच्या मुर्ती, शंकराच्या पिंडी, झाडांची खोडे आजही जुन्या आंबेगावच्या आठवणी जाग्या करून विस्थापितांच्या डोळयांत पाणी आणतात.

Google search engine