दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२४-२५ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी २५ मेपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, ऊस लागवडीसाठी २५ मे २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये को.८६०३२, व्हि.एस.आय. ०८००५, एम.एस.१०००१, को.९०५७, को.व्हि.एस.आय.१८१२१, पिडीएन १५०१२, को.एम.११०८२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. २५ मे २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच माहे मे २०२४ अखेर को.८६०३२ या जातीच्या ऊसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना गाळप हंगाम २०२४-२५ साठी तोड करावयाची असल्यास गाळपासाठी घेतला जाईल. त्याकरिता ऊसाची नोंद कारखाना शेतकी विभागीय कार्यालयात करण्यात यावी.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार २५ मे २०२४ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पुर्तता संबधित विभागीय गट कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येवून ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे, बायोकंपोष्ट / प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएस.आय.चे मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक अॅसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशक बी.व्ही.एम., ई.पी.एन. इ.चा पुरवठा, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, ऊस पिक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घेणेत यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांना ऊस नोंदणीबाबत हरकत असल्यास लागवडीपासून २ महिन्याचे कालावधीत कारखाना कार्यालयात येवून हरकत नोंदवावी. कालावधीत हरकत नोंद न केल्यास पुढे हरकतीचा विचार केला जाणार नाही. ऊस पिक स्पर्धेअंतर्गत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले प्रवेश शुल्क रु.१००/- डिसेंबर २०२४ अखेर भरुन नाव नोंदणी करावी.
ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचा प्रादुर्भाव टाळणेसाठी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे खरेदी केले जाणार असून हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक कीड नियंत्रण करावे.
तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांची अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.