आंबेगाव तालुक्यात खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने महाविकास आघाडीत बिघाडी…..

2949
Google search engine

मंचर: मंचर शहरातील जाहीर सत्कार कार्यक्रमात खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष (ग्रामीण) देवदत्त निकम यांचा उल्लेख भावी आमदार असा केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते व्यासपीठ सोडून खाली आले. समोर घोषणाबाजी सुरू झाल्याने कोल्हे यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. शिवसैनिकांनी कोल्हे यांना जाब विचारला. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मी निकम यांची उमेदवारी जाहीर केली नाही महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असे स्पष्टीकरण कोल्हे यांनी दिले. दरम्यान महाविकास आघाडीने लोकसभेत राज्यात आपले चांगले स्थान निर्माण केले होते, खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने राज्यात सर्वात प्रथम महाविकास आघाडीत आंबेगाव तालुक्यात वाद निर्माण सुरू झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केल्याने खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा जाहीर सत्कार काल सायंकाळी मंचर शहरात आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून कोल्हे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने शहरात फेरी मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भाषणाच्या मध्येच कोल्हे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख केला आणि सभेतील चित्र पालटले. व्यासपीठावर बसलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठ सोडून खाली आले. नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठांसमोरून घोषणा देण्यास सुरुवात केली. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाषण सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने कोल्हे यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात डॉ.अमोल कोल्हे यांना 93 हजार मते पडले असून त्यातील तब्बल 60 हजार मते ठाकरे गटाची आहेत. इतर पक्षांची मिळून केवळ 30 हजार मते आहेत.अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा जो उल्लेख केला आहे त्याला आमचा आक्षेप आहे. निवडणूक काळात कोल्हे यांना अक्षरशा पोलिंग एजंट मिळत नव्हते. आम्हाला निवडणूक साहित्य मिळाले नाही. तरीही आम्ही कोल्हे यांना खासदार करण्याचा चंग बांधला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही झटून कोल्हे यांचा यांचे काम केले. शिवसैनिकांनी दिवस रात्र मेहनत केली. मात्र कोल्हे यांचा चुकीचा विचार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मान्य नाही. त्यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून केलेला उल्लेख चुकीचा आहे. कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी मतदारसंघात सर्वे करण्यास सांगितले आहे. जिथे जिथे शिवसेना प्रबळ आहे तेथील जागेसाठी आमचा पक्ष आग्रही राहणार आहे. शिवसेना आंबेगाव शिरूर विधानसभा जागेसाठी आम्ही आग्रह धरणार आहे. मात्र कोल्हे यांनी आताच उमेदवारी जाहीर केलेली आम्हाला पटलेली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले खूपच आक्रमक झाले होते. त्यांनी कोल्हे यांनी देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर करून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आतून मदत करायची आहे असा आरोप केला. जिल्हाप्रमुख सुरेश भोर व मी भाषणात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इच्छुक असल्याचे सांगितले आहे. मात्र महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आघाडी धर्म पाळू असे भाषणात स्पष्ट केले आहे. असे असताना खासदार कोल्हे यांनी निकम यांचा भावी आमदार असा केलेला उल्लेख म्हणजे उमेदवारी जाहीर करणे हाच होतो. भविष्यात कोल्हे यांच्यावर आमचा विश्वास नाही. वास्तविक पाहता नेते उमेदवारी जाहीर करतात. कोल्हे केवळ खासदार आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही. यासंदर्भात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे.वरिष्ठ नेते जो निर्णय देतील तो मान्य असल्याचे बाणखेले म्हणाले. शिवसैनिक अनिल निघोट आक्रमक झाले होते ते म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. कोल्हे यांनी केलेली घोषणा आम्हाला चालणार नाही.शिवसेनेच्या जीवावर ते खासदार झालेत निवडणूक काळात कट्टर शिवसैनिकांनी टेबल लावून त्यांचे काम केले आहे. महिला आघाडीच्या सुरेखा निघोट म्हणाल्या नेत्यांची एकत्र बैठक झाली नाही. आंबेगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 70 हजार मते आहेत त्यामुळे अशी घोषणा करणे योग्य नाही.
शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माघार घेत स्पष्टीकरण दिले माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवसैनिकांनी जीवाचे रान करून प्रचार केल्यामुळे विजय संपादन मिळाला आहे. महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य राहील. मी देवदत्त निकम यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही.कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली होती ती मी सांगितली. महाविकास आघाडी विधानसभेला जो उमेदवार देईल एक घटक पक्ष म्हणून मला तो मान्य असेल जागा वाटपात ज्या पक्षाला ही जागा जाईल त्याचे काम करू असे सांगून कोल्हे म्हणाले उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार मला नाही. जबाबदारीने सांगतो भाषण सुरू असताना आजान सुरू झाली. त्यामुळे मला भाषण थांबवावें लागले. तो उल्लेख झाल्यानंतर भाषण थांबवल्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला आहे. शिवसैनिकांनी मनापासून काम केल्याचे मी पाहिले असून मला जाणीव आहे. आजच्या कार्यक्रमात सविस्तर गोष्टी बोलायच्या होत्या अनेक खुलासे करायचे होते. मात्र पावसामुळे ते शक्य झाले नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून उमेदवारी बाबत निर्णय घेतील व महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणा दिल्या. कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आवाज कुणाचा शिवसेनेचा, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. शिवसेना पदाधिकाऱ्यांना शांत करताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी कार्यकर्त्यांना तुमचा गैरसमज झाला आहे. उमेदवारी जाहीर झालेली नाही बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.

Google search engine