पुणे व शिरूर तालुक्यातील अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने चालविण्यास दिल्याने दुर्घटना घडून नागरिकांना जीव गमवावा लागला होता, त्यामुळे आता परिवहन खाते ग्रामीण भागातही अल्पवयीन वाहन चालकाकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्यास सुरू केले आहे, ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहने चालविण्यास देऊ नये. चालविताना आढळल्यास शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल,अशा सूचना वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे यांनी दिल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यात आज विविध भागात वाहन निरीक्षक शिंगारे यांनी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिवाजी पाटील,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सायली नानिवडेकर यांच्यासह दौरा केला असता यावेळी अनेक वाहन चालक विनापरवाना विना हेल्मेट विना विमा तसेच अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली त्यात त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना शिंगारे म्हणाले येथून पुढील काळात आंबेगाव तालुक्यातील विविध भागात कायमच आमचे दौरे असणार असून वाहन चालकांनी आपल्या वाहनाची कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना, आदि गोष्टी जवळ ठेवून, तसेच हेल्मेट चा वापर, व शासनाच्या इतर नियमांचे पालन करावे. विशेषतः आपल्या लहान अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये; याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान अल्पवयीन वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात आला आहे, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये अन्यथा खिशाला मोठा आर्थिक भुर्दंड बसेल.