आंबेगाव तालुक्यात सर्वत्र मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू नागरिकांनी पावसामध्ये बाहेर जाताना स्वतःची ही काळजी घ्यावी. विशेषतः आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे दरडप्रवण भागातील नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रांत तसेच प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
आदिवासी भागात आहूपे खोऱ्यात मुसळधार पावसामुळे आसाणे (कुंभेवाडी) घाटामध्ये दरड कोसळल्याने तीन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. राज्याचे सहकारमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, व सहकारी, पदाधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदतकार्य सुरू केले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच तालुक्यातील सर्व परिस्थितीवर राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत.
हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी व आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन, आपत्ती व्यवस्थापनाने केली आहे.