दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२२-२३ हंगामामधील वसंतदादा पाटील “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
शनिवार (दि. १० ऑगस्ट) रोजी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा व “शुगरकेन अॅन्ड बायो एनर्जी – पॉवर ऑफ विकसित भारत” विषयावरील एकदिवसीय परिषदेमध्ये देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय सहकार राज्य मंत्री कृष्णपाल, उत्तर प्रदेश राज्याचे साखर व ऊस विकास मंत्री चौधरी लक्ष्मण नारायण, गुजरातचे माजी मंत्री ईश्वरभाई पटेल, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशातील साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
भीमाशंकर कारखान्याचा पुरस्कार चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, गणेश कोकणे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे व सेक्रेटरी रामनाथ हिंगे यांनी स्विकारला.
कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले, आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार ६ वेळा मिळविणारा भीमाशंकर हा देशातील एकमेव साखर कारखाना असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
Home आपलं आंबेगाव राष्ट्रीय पातळीवरील “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार भीमाशंकर कारखान्याला प्रदान….