शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांची अधिक माहिती जनतेला व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जन सन्मान यात्रा निघाली आहे. रविवार दि. 18 रोजी ही यात्रा आंबेगाव तालुक्यात येत असून त्यावेळी जाहीर मेळावा व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी कार्यालय पूजन प्रेस्टीज मंचर येथे चव्हाण बोलत होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुले, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे, महिला अध्यक्ष सुषमा शिंदे, युवक अध्यक्ष अंकित जाधव आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जन सन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. आंबेगाव मतदार संघात रविवार दि. 18 रोजी ही यात्रा येणार असून यावेळी शेतकरी, कष्टकरी तसेच महिलांशी उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधणार आहेत .ही एक वेगळी यात्रा असून सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य तसेच विकासापासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील ,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,रूपाली चाकणकर तसेच प्रांतिक सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मंचर येथील रामनगरी येथे जाहीर सभा होणार आहे असे सांगून चव्हाण यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. लाडकी बहीण योजनेवर टीका करणारेच या योजनेचे फॉर्म भरा असे आवाहन करणारे बॅनर लावत आहेत.योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
यावेळेस बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे म्हणाले 18 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जनसामान्य यात्रा आंबेगाव तालुक्यात मंचर येथील छत्रपती शिवाजी चौकात येणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रामनगरी भव्य पदयात्रा निघणार आहे. रामनगरी येथे शेतकरी, महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांची अजितदादा यांच्याशी चर्चा अवसरी फाटा येथील विघ्नहर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.