श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे आयोजित निमंत्रित बैलगाडा शर्यतीत अमोल कैलास गाडेकर यांचा बैलगाडा प्रथम क्रमांकात फळीफोड ठरला आहे. फायनल शर्यतीत तब्बल 19 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला.
श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे आयोजित निमंत्रित 20-20 बैलगाडा शर्यतीत पहिल्या फेरीत 135 सहभागी झाले होते. शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. प्रथम क्रमांकात अमोल कैलास गाडेकर यांचा बैलगाडा फळीफोड ठरला तर द्वितीय क्रमांकाची फळी वडगाव काशिंबेग येथील विकास बबन खंडागळे यांच्या बैलगाड्यांने फोडली. सायंकाळी प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत झाली. तब्बल 19 बैलगाड्यांनी यात सहभाग घेतल्याने चित्तथरारक शर्यतींचा अनुभव आला. बैलगाडा शौकिनांनी यावेळी एकच गर्दी केली होती. दत्ता पाचुंदकर, श्रीराम मित्र मंडळ ,भिकाजी तुकाराम चव्हाण ,लाडक्या ग्रुप बैलगाडा संघटना, तुकाराम लक्ष्मण जाधव, मारुती विष्णू डोके, रामशेठ बाबुराव थोरात, पाटीलबुवा बाळाजी दाभाडे यांच्या बैलगाड्यांनी चार मोटरसायकलचे बक्षीस पटकावले. गुलाबराव किसनराव गिलबिले, संतोष विठ्ठल पिंगळे यांना दोन सोन्याची अंगठी, पवन विठ्ठल हगवणे, अमोल कैलास गाडेकर यांना दोन फ्रिज तर श्रीकृष्ण दगडू पिंगळे व जयसिंग यशवंत घेवडे यांना दोन टीव्ही बक्षीस देण्यात आले. विजेत्या बैलगाड्यांना तब्बल एक लाख 90 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. दरम्यान यावेळी कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर लक्ष्मण पिंगळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक अंकित जाधव, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ झाला .यावेळी बाळासाहेब बेंडे यांनी गावाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर सत्काराला उत्तर देताना शंकर पिंगळे यांनी उपस्थिताचे आभार मानले. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच वैभव पोखरकर यांनी आभार मानले.