मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 7 ते 10 फेब्रुवारी यादरम्यान आंबेगाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी काल तयारीची पाहणी केली.
मागील दहा वर्षापासून हा महोत्सव आयोजित केला जातो. कृषी उत्पन्न बाजार समिती, अडत व्यापारी असोसिएशन, अनुसया महिला उन्नती केंद्र व रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव महोत्सवाचे आयोजन सलग चार दिवस मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आले आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संयोजक महेश मोरे ,ज्योती निघोट, सरपंच नवनाथ निघोट, बाजार समितीचे सचिव सचिन बोराडे आदींनी आज तयारीची पाहणी केली. आंबेगाव महोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली. या महोत्सवात छोट्या पासून मोठ्या पर्यंत सर्वांसाठी सर्व काही असणार आहे. कृषी पणन क्षेत्र, शेतमाल प्रक्रिया उद्योग, दुग्धोत्पादने, ऑटोमोबाईल ई वाहने उद्योग, बांधकाम क्षेत्र, बँका विमा पतसंस्था, कापड उद्योग, कॅम्पुटर व इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा उपकरणे, गृह उपयोगी वस्तू, बचत गट उत्पादने, विद्युत उपकरणे, किराणा मसाले, सेवा उद्योग, फर्निचर आदी स्टॉलचा महोत्सवात सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे शेतीशी निगडित अनेक उत्पादने मांडण्यात येणार आहेत. खवय्यासाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे अनेक प्रकार येथे असणार आहेत. सर्वांना फायदेशीर अशा तांबूल आयुर्वेदिक पानाचे विविध प्रकार या महोत्सवात पाहण्यास मिळणार आहे.शुक्रवारी अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पना आढळराव पाटील या असणार आहेत.