सकल आंबेगाव जैन समाजाच्या वतीने घोडेगाव येथे मूक मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन.

 जाहिरात

सिताराम काळे:

विलेपार्ले, मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर उध्वस्त केलेल्या महानगरपालिकेच्या अधिका-यांना समज देवून तातडीने जैन मंदिर पुर्ननिर्माण करावे अशी मागणी सकल जैन समाज आंबेगाव यांच्या वतीने शासनाकडे देण्यात आली आहे .
याबाबतचे निवेदन जैन समाजाचा वतीने तहसीलदार संजय नागटिळक यांना देण्यात आले . यावेळी माजी सभापती कैलासबुवा काळे, नरेंद्र समदडिया, दीपक लोढा, जयेश शहा, प्रफुल्ल चनोदिया, गिरीश राठोड, आशिष पुंगलिया, अमोल पारेख, राजू भंडारी, विनोद शहा, नवीन गुगले , राजेंद्र गांधी, सतीश शहा, अजित गांधी, शिरीष पारेख. अजित खिंवसरा, कमलेश शहा, साहिल शहा, योगेश पारेख, प्रितेश गांधी, सचिन दोशी, आदीसह महीला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते . घोडेगाव येथील जैन मंदिरापासून आंबेगाव तहसील कार्यालयापर्यंत कडक उन्हात दिड किलोमीटर पायी मुक मोर्चा काढण्यात आला.

या वेळी दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की मुंबई महानगरपालिकेने दि. १६ एप्रिल २०२५ रोजी विलेपार्ले पुर्व मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर कोणतेही पुर्वसुचना न देता पाडल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती दिली असतांना दबावामुळे व आमिषाला बळी पडून घाईघाईने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंदिर जमीनदोस्त करुन अल्पसंख्याक जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जैन मंदिर, तीर्थक्षेत्र, स्थानक हे भारतीय संस्कृतीचे भूषण आहे. जैन समाजाने देशाच्या उन्नतीसाठी कायमच बहुमोल योगदान दिलेले आहे. जैन समाज शांतताप्रिय अंहिसक व कोणालाही न दुखवता भक्तीभावाने व श्रध्देने पूजा अर्चा करतो अशा अल्पसंख्यांक जैन समाजाचे उपासना स्थळ जमीनदोस्त करुन उध्वस्त करणे हे शासनास व प्रशासनास शोभनीय व समर्थनीय कार्य नाही. या घटनेची आंबेगाव तालुक्यातील सकल जैन समाज व जैन संघटना जाहीर निषेध करीत आहे. जैन मंदिर उध्वस्त करणा-या अधिका-यांवर कार्यवाही करुन जैन मंदिर पूर्ववत निर्माण करुन द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून हे निवेदन देण्यासाठी मंचर जैन संघ, घोडेगाव जैन संघ, पारगाव जैन संघ. व तालुक्यातील जैन बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 जाहिरात