मंचर येथील मुख्य बस स्थानकावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना दररोज हाल सोसावे लागत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.
बस स्थानकात दररोज शेकडो प्रवासी, महिला, विद्यार्थी, वृद्ध ये-जा करतात. मात्र स्थानक परिसरात असलेले उघडे खड्डे व खचलेली जमीन यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काही नागरिकांनी किरकोळ दुखापतींचाही अनुभव घेतला आहे.
या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अमोल शेलार यांनी आगार प्रमुख यांना सात दिवसांत खड्डे बुजवण्याचे लेखी निवेदन दिले असून, त्यानंतरही उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही न झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल, असेही म्हटले आहे.