आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी /वाळुंज नगर येथे मागील तीन महिन्यापासून धुमाकूळ घालणारी मादी बिबट्या जेरबंद झाल्याने या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
खडकवाडी व वाळुज नगर या परिसरात मागील तीन महिन्यापासून बिबट्याने सात जणांवर हल्ले केले होते, याबरोबर अनेक जणांच्या पाठीमागे बिबट मादीने धाव घेतली होती, यामुळे ग्रामस्थ वारंवार बिबट्याला पकडण्याची मागणी करत होते त्यानुसार मंचर वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी या परिसरात दोन ठिकाणी पिंजरे लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वाळुंजनगर येथे मराठी शाळेच्या मागे दत्तात्रेय बबन वाळुंज यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक अंदाजे तीन वर्षीय बिबट मादी व अंदाजे एक वर्षीय बछडा जेरबंद झाला आहे ही माहिती कळताच विकास भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल निलम चव्हाण तसेच वनरक्षक योगेश निघोट तसेच रेस्क्यू मेंबर मनोज तळेकर शीघ्र कृती दल अवसरी / गावडेवाडी मेंबर चारू दत्त बाबळे , धर्मेंद्र ढगे, बापू वाघ, हर्षल गावडे, दीपक भोंडवे, प्रज्वल आवरी, प्रकाश हिले, कुणाल गावडे, ऋषिकेश विधाटे, शुभम शिस्तार, महेंद्र दाते, शुभम येवले यांनी घटनास्थळी धाव घेत, बिबट मादी व बटाट्याला ताब्यात घेऊन अवसरी वन उद्यानात तपासणी करून बिबट मादी व बछडा यांना माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्र येथे पाठवणार असल्याचे मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी सांगितले.
या परिसरात अजूनही बिबट बछडा असल्याचे ग्रामस्थ सांगत आहे वन विभागाने या बछड्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा बसवण्याची मागणी महेंद्र वाळुंज यांनी केली आहे.